‘आधुनिक किसान’ची पुरस्कारप्राप्त वेबसाईट

औरंगाबादहून शेती आणि ग्रामविकासाचे ‘आधुनिक किसान’ हे साप्ताहिक सुरू झाले. ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव त्याचे संपादक आणि संचालकही आहेत. आधुनिक किसानला एक परिपूर्ण न्यूज पोर्टल आणि कृषी दैनिक असे ऑनलाईन स्वरूप द्यायचे होते. शेतकर्‍यांना बातम्या, घडामोडी, हवामान, ई-साप्ताहिक अशा अनेक गोष्टी समजाव्यात, त्यांना साप्ताहिकाशी संवाद साधता यावा. आपल्या समस्या वेबसाईटच्या माध्यमातूनच विचारता याव्यात अशी रचना या वेबसाईटची हवी होती. याशिवय कृषी आणि ग्रामविकासाच्या दृष्टीेने माहितीने परिपूर्ण असेही ते हवे होते. याशिवाय हीे वेबसाईट अत्याधुनिक, नव्या युगाची, आकर्षक स्वरूपाची आणि सहज समजेल अशीही हवी होती. या सर्व दृष्टींचा विचार करून आमचे प्रयत्न सुरू झाले.

साप्ताहिक, दैनिक आणि न्यूज पोर्टल असे तिहेरी स्वरूप देण्यासाठी म्हणून एका विशिष्ट डिझाईनची आवश्यकता होती. त्यावर बरेच काम केल्यानंतर सध्या असलेले आधुनिक किसानचे वेब डिझाईन वापरण्याचे निश्चित केले.

आधुनिक किसान हे एक बर्‍यापैकी विस्तार असलेले माध्यम असल्याने, त्यांच्या गरजाही तितक्याच महत्त्वाच्या होत्या. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या वेबसाईटवर दररोज किमान दोन हजार लोक तरी भेट देणार होते. त्यादृष्टीने बँडविड्थची निवड करणे गरजेचे होते. कारण अनलिमिटेड बँडविड्थ असेल तर तुमच्या वेबसाईटवर कितीही लोकांची भेटी दिल्या तरी त्याची फारशी काळजी करण्याची गरज नसते.

आधुनिक किसानचे जिल्हा, तालुकावार प्रतिनिधी असल्याने संबंधित प्रतिनिधींना त्या त्या ठिकाणाहून वेबसाईटमार्फत बातम्या अपडेट करण्याची सोयही या वेबसाईटमध्ये हवी होती. शिवाय मुख्य कार्यालयातील प्रतिनिधींनाही वेबसाईट दररोज अपडेट(दिवसातून किमान 4 ते 5 वेळा) अपडेटे करता येण्याची सोय त्यात हवी होती. या सगळ्या बारीक सारिक गोष्टी लक्षात घेऊन ‘कंटेन्ट मॅनेजमेंट सिस्टिमची’ सोय या वेबसाईटमध्ये करण्यात आली. त्यामुळे डिझाईन बदलण्यापासून ते बातम्या बदलण्यापर्यंतचे सर्व स्वातंत्र्य ‘आधुनिक किसान’ला मिळाले.

औरंगाबाद येथील प्रसिद्ध पंचतारांकित रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हा राजकारण, उद्योग, कृषी आणि माध्यमांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनाच आधुनिक किसानची वेबसाईट खूप आवडली. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाने 2011च्या मराठी वेबसाईटच्या पुरस्कारांमध्ये आधुनिक किसानच्या वेबसाईटची निवड केली. रचना, मांडणी आणि आशय या सर्वच बाबतीत आधुनिक किसानची वेबसाईट सरस ठरली तेव्हा आमच्या श्रमाचे खर्‍या अर्थाने सार्थक झाल्यासारखे वाटले.

आज या वेबसाईटने वर्ष पूर्ण केले असून गुगल अ‍ॅनॅलिटिक्सच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात जवळपास दोन लाखांपेक्षाही जास्त वाचकांनी आधुनिक किसानला भेट दिली आहे. विशेष म्हणजे अगदी मोजक्या पैशांत ही वेबसाईट आकाराला आली.