‘आधुनिक किसान’ची पुरस्कारप्राप्त वेबसाईट

औरंगाबादहून शेती आणि ग्रामविकासाचे ‘आधुनिक किसान’ हे साप्ताहिक सुरू झाले. ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव त्याचे संपादक आणि संचालकही आहेत. आधुनिक किसानला एक परिपूर्ण न्यूज पोर्टल आणि कृषी दैनिक असे ऑनलाईन स्वरूप द्यायचे होते. शेतकर्‍यांना बातम्या, घडामोडी, हवामान, ई-साप्ताहिक अशा अनेक गोष्टी समजाव्यात, त्यांना साप्ताहिकाशी संवाद साधता यावा. आपल्या समस्या वेबसाईटच्या माध्यमातूनच विचारता याव्यात अशी रचना या वेबसाईटची हवी होती. याशिवय कृषी आणि ग्रामविकासाच्या दृष्टीेने माहितीने परिपूर्ण असेही ते हवे होते. याशिवाय हीे वेबसाईट अत्याधुनिक, नव्या युगाची, आकर्षक स्वरूपाची आणि सहज समजेल अशीही हवी होती. या सर्व दृष्टींचा विचार करून आमचे प्रयत्न सुरू झाले.

साप्ताहिक, दैनिक आणि न्यूज पोर्टल असे तिहेरी स्वरूप देण्यासाठी म्हणून एका विशिष्ट डिझाईनची आवश्यकता होती. त्यावर बरेच काम केल्यानंतर सध्या असलेले आधुनिक किसानचे वेब डिझाईन वापरण्याचे निश्चित केले.

आधुनिक किसान हे एक बर्‍यापैकी विस्तार असलेले माध्यम असल्याने, त्यांच्या गरजाही तितक्याच महत्त्वाच्या होत्या. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या वेबसाईटवर दररोज किमान दोन हजार लोक तरी भेट देणार होते. त्यादृष्टीने बँडविड्थची निवड करणे गरजेचे होते. कारण अनलिमिटेड बँडविड्थ असेल तर तुमच्या वेबसाईटवर कितीही लोकांची भेटी दिल्या तरी त्याची फारशी काळजी करण्याची गरज नसते.

आधुनिक किसानचे जिल्हा, तालुकावार प्रतिनिधी असल्याने संबंधित प्रतिनिधींना त्या त्या ठिकाणाहून वेबसाईटमार्फत बातम्या अपडेट करण्याची सोयही या वेबसाईटमध्ये हवी होती. शिवाय मुख्य कार्यालयातील प्रतिनिधींनाही वेबसाईट दररोज अपडेट(दिवसातून किमान 4 ते 5 वेळा) अपडेटे करता येण्याची सोय त्यात हवी होती. या सगळ्या बारीक सारिक गोष्टी लक्षात घेऊन ‘कंटेन्ट मॅनेजमेंट सिस्टिमची’ सोय या वेबसाईटमध्ये करण्यात आली. त्यामुळे डिझाईन बदलण्यापासून ते बातम्या बदलण्यापर्यंतचे सर्व स्वातंत्र्य ‘आधुनिक किसान’ला मिळाले.

औरंगाबाद येथील प्रसिद्ध पंचतारांकित रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हा राजकारण, उद्योग, कृषी आणि माध्यमांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनाच आधुनिक किसानची वेबसाईट खूप आवडली. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाने 2011च्या मराठी वेबसाईटच्या पुरस्कारांमध्ये आधुनिक किसानच्या वेबसाईटची निवड केली. रचना, मांडणी आणि आशय या सर्वच बाबतीत आधुनिक किसानची वेबसाईट सरस ठरली तेव्हा आमच्या श्रमाचे खर्‍या अर्थाने सार्थक झाल्यासारखे वाटले.

आज या वेबसाईटने वर्ष पूर्ण केले असून गुगल अ‍ॅनॅलिटिक्सच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात जवळपास दोन लाखांपेक्षाही जास्त वाचकांनी आधुनिक किसानला भेट दिली आहे. विशेष म्हणजे अगदी मोजक्या पैशांत ही वेबसाईट आकाराला आली.

आमच्या यशकथा

कमी वेळात तयार झाली ‘गोदाटाईम्स’

एरवी आपण एखादा उपक्रम, संस्था सुरू करतो आणि त्यामाध्यमातून पुढची वाटचाल करतो. व्यावसायिक पातळीवरचा विचार करायचा झाला तर अशी संस्था व्यावसायिक दृष्टीने आधी स्वत:ची वेबसाईट सुरू करेल आणि आपल्याकडे येणार्‍यांसाठी वेबनिर्मिती करेल. पण आमच्या बाबतीत वेगळेच घडले.

‘वेब माध्यम’ची निर्मिती प्रक्रिया सुरू असतानाच नाशिकचे आमचे मित्र आणि वरिष्ठ पत्रकार श्री मनोज कापडे यांचा फोन आला. नाशिकच्या संदर्भात एक चांगली, दर्जेदार वेबसाईट सुरू करण्याचा त्यांचा विचार होता.

स्वत: पत्रकारितेच्या क्षेत्रात 20 पेक्षा जास्त वर्ष प्रामाणिकपणे कार्यरत असणार्‍या श्री कापडे यांना पत्रकारिता आणि सामाजिकेच्या दृष्टीकोनातून एक वेगळे व्यासपीठ उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी इंटरनेट जगतातील माध्यमाचा अर्थातच वेबसाईटचा पर्याय निवडला.

झालं ! वेबमाध्यमचे काम प्राथमिक अवस्थेत ठेवून सर्वप्रथम श्री कापडे यांना प्राधान्य द्यायचे ठरविले (ग्राहक देवो भव: या नात्याने.) कारण काही झालं तरी हे आमचं पहिलंवहिलं काम होतं. यासंदर्भात प्राथमिक बोलणं झालं आणि पहिल्याच दिवशी डोमेन नेम (वेबसाईटचे नाव) ठरवून ते टेक्नोक्राफ्टच्या माध्यमातून रजिस्टरही करवून घेतलं. पुढे वेबहोस्टींग वगैरेबाबत आणि त्यासाठी येणार्‍या खर्चाबाबत श्री कापडेे यांना कल्पना दिली.

खर्चाच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर सर्वांना परवडेल अशा किंमतीत काम करणे हा आमचा व्यवसायाचा उद्देश आम्ही सुरुवातीपासूनच ठरविलेला होताच. त्यामुळे अतिशय माफक दरात बहुसुविधा (डायनॅमिक) असणार्‍या वेबसाईटची निर्मिती होऊ शकते, याबाबत श्री कापडे यांना आश्वासित केले. तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला.

कारण अनेकांनी त्यांना वेबसाईटबाबत मेन्टेनन्स खर्चासह काही हजारांपासून ते लाखांपर्यंतची रक्कम सांगितली होती. शिवाय यापैकी बर्‍याच जणांना मराठी आशय, साहित्य याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे आपल्या भावना त्यांना कळतील का? असाही एक प्रश्न श्री कापडे यांच्यासमोर होता.

त्यामुळेच आम्ही जेव्हा त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी, दर्जदार स्वरूपात, आकर्षक रूपात आणि वाजवी खर्चात देऊ केल्यावर मनोज कापडे यांनी मोठ्या विश्वासाने आणि निर्धास्तपणे ‘वेब माध्यम’वर जबाबदारी सोपविली.

त्यानंतरच्या घडामोडी फारच वेगवान झाल्या. आम्हाला तांत्रिक सहकार्य करणार्‍या टेक्नोक्राफ्ट लॅबचे श्री अमित काजळे यांनी तातडीने पावले उचलली आणि पुढील दोन दिवसात श्री कापडे यांच्या स्वप्नातील ‘गोदाटाईम्स’चा प्राथमिक आराखडा प्रत्यक्ष ऑनलाईन झाला. आता आवश्यकता होती. त्या वेबसाईटवर काय लेख, बातम्या टाकाव्या याची.

त्यासाठी श्री कापडे हे अक्षरश: युद्ध पातळीवर कामाला लागले आणि त्यांनी पुढच्या दोन दिवसांतच जवळपास 20 लेखांची निर्मिती केली. त्यांच्या या कष्टाचे फळ म्हणजे सहाव्या दिवशी परिपूर्ण पद्धतीने तयार झालेली गोदा टाइम्स ही दर्र्जेदार, आकर्षक वेबसाइट. एवढं सुंदर काम बघून मनोज कापडे फारच भावुक झाले. वारंवार आम्हाला ते धन्यवाद देत होते. अर्थात हा सर्व काही त्यांच्या इच्छाशक्तीचाच भाग होता हे काही काही वेगळं सांगायला नको.

थोडक्यात काय, तर मनात आल्यापासून अवघ्या आठवडाभराच्या आत आमची पहिली वेबनिर्मिती ऑनलाईन होती. त्यातून मिळणारा आनंद हा कुठल्याही पैशांत न मोजता येणारा असाच आम्हाला वाटला. विशेष म्हणजे आपण आपल्या कामातून समोरच्यांना समाधान देऊ शकतो. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवू शकतो याचाही एक आत्मविश्वास आम्हाला या निमित्ताने प्राप्त झाला.

विशेष म्हणजे केवळ वेबसाईट बनवून आमचे काम थांबले नाही. वेबसाईट तयार होत असताना, ती अपलोड कशी करायची इथपासून ते तिच्या रचनेत आपल्याला हवे ते बदल कसे करायचे इथपर्यंत सर्वंकश मार्गदर्शन आम्ही श्री मनोज कापडे यांना न थकता करत होतो.

प्रत्येकाने आपली वेबसाईट स्वत;च चालविली पाहिजे, त्यासाठी त्यांना ‘ बॅकएन्डला कंटेन्ट मॅनेजमेंट टूल’ अर्थातच ‘आशय व्यवस्थापन साधन’ तयार करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे आम्हाला वाटते. त्याच अनुषंगाने श्री कापडे यांनाही कंटेन्ट मॅनेजमेंट टूल देण्यात आले आणि वेबसाईटची संपूर्ण जबाबदारी कुठलीही गोष्ट हातची राखून न ठेवता आम्ही त्यांच्याकडे सोपविली.

त्यांनीही वेबसाईट अपडेट करणे, व्यवस्थापन करणे या गोष्टी अवघ्या दोन दिवसातच आत्मसात केल्या आणि आता ते स्वत:ची वेबसाईट स्वत;च मेंटेन करत आहेत आणि निर्मितीचा आनंद घेत आहे. शिवाय त्यातून त्यांचा मोठा खर्चही वाचला आहे. हेही नसे थोडे.

नेवासा तालुका बनतोय फुलांचे आगार पॉलीहाऊसमध्ये बहरली जरबेरा शेती

धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यात पॉलीहाऊसमधील फुलशेतीने चांगलाच जोर धरला असून, गट शेतीच्या माध्यमातून शनिशिंगणापूर, वडाळा (बहिरोबा), कांगोणी परिसरात ग्रीन हाऊसमध्ये जरबेरा फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. उसासारख्या पारंपरिक नगदी पिकांपासून फुलशेतीकडे वळालेले हे शेतकरी ङ्गुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळवित आहेत. कृषी विभागाचे प्रोत्साहन व सहकार्य मिळत असल्याने दिवसेंदिवस अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत.

Read More

शेतीची शिक्षिका…

‘मले काम धंदे नाही वाटते. जसे काही तुम्हालेच गडबड आहे, कामधंद्याची. अडी बोल्याचे काय सरकार पैसे देत नाही. काही हौस नाही तुम्हाले शेतीतले अनुभव सांगायची. ऐकायचे अशीन त् ऐका नाहीत उठा.’ हे बोल कुण्या रांगड्या पुरुषाचे असावेत, असे वाटते. मात्र, अस्सल वर्‍हाडी भाषेतील हे बोल आहेत पौर्णिमाताई सवई या प्रगतिशील शेतकरी महिलेचे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शेतीत पुरुषच नाही, तर महिलाही तेवढ्याच ताकदीने भरारी घेऊ शकतात हे सिद्ध केलेे आहे. पुरुषांचा दबदबा आपण सर्वच क्षेत्रात बघतो. त्याला शेतीही अपवाद नाही. मात्र, पौर्णिमाताईंनी शेतीतही महिला कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील एका कार्यक्रमात समोर बसलेल्या शेतकर्‍यांचा गोंधळ सुरू होता. व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाने या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव काही शांत होईना. यावेळी पौर्णिमाताई स्वत: व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांनाही आयोजकांनी ‘ताई फक्त पाच मिनिटे बोला व भाषण आटोपते घ्या,’ असा सल्ला दिला. पौर्णिमाताई उठल्या आणि व्यासपीठावरून अस्सल वर्‍हाडी भाषेत व रांगड्या शैलीत उपरोक्त निवेदन करताच उपस्थित जमाव शांत झाला. ताईंनी पाच मिनिटांऐवजी दीड तास भाषण दिले. तेव्हापासून हा आवाज व्यासपीठावरूनच नाही, तर शेतातल्या बांधावरून, शेतकर्‍यांच्या घराघरांतून घुमतो आहे. ‘पोरी, पुढे शिक्षिका होऊन भरारी घे…’ हेे वडिलांचे शब्द नेहमी स्मरणात ठेवत पौर्णिमाताईंनी शेतीतल्या शिक्षिकेच्या भूमिकेतून गगनभरारी घेऊन दाखविली आहे. आज त्यांच्या शेतात लागवडीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत, काढणीपासून ते बाजारात नेईपर्यंत सर्व कामे पौर्णिमाताई सांभाळतात. शेतातील वेगवेगळे प्रयोग, गांडूळ खताचा उत्पादन प्रकल्प, दुुग्धव्यवस्थापनाचा व्यवसाय या सर्वांचे व्यवस्थापनही त्याच बघतात.

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात नेरसोपंत येथे शेतकरी कुटुंबात १९६६ साली पौर्णिमाताईंचा जन्म झाला. माहेरी ४५ एकर शेती. मात्र, डब्बा पार्टीपुरता शेताचा आणि ताईंचा संबंध. मुलींनी शेतात काम करू नये, असे वडिलांचे नेहमी सांगणे. दोन भाऊ शेती कसत. २ जून १९८५ मध्ये त्यांचा विवाह टाकरखेडा, ता. भातकुली, जि. अमरावती येथील विजयराव सवई यांच्याशी झाला. सासरी ३६ एकर शेती. मात्र, सर्व शेती कोरडवाहू. एवढ्या मोठ्या शेतीत एक एकर क्षेत्रही ओलिताखाली नसावे हे त्यांच्या मनाला सतत बोचत असे. त्यांनी शेतात विहीर खोदली व बोअरवेल घेतले. आज ३६ एकर क्षेत्र ओलिताखाली येईल एवढी सिंचनक्षमता त्यांनी विकसित केली आहे.

विदेशात कमीत कमी वयात पदवीधर झाल्याचे उदाहरण आपण बर्‍याचवेळा ऐकतो. आपल्या देशात ज्या वयात १२ वी होते त्या वयात पदवीधर झाल्याची उदाहरणे बोटावर मोजण्याइतकी. मात्र, या उदाहरणांमध्ये पौर्णिमाताई येतात. वयाच्या तिसर्‍या वर्षातच शाळेत घातल्यामुळे ताई वयाच्या १८ व्या वर्षी वाणिज्य शाखेत पदवीधर झाल्या. बी. कॉम.च्या अंतिम वर्षाला असतानाच ताईंचे लग्न झाले. तरीही त्यांनी आपला कमी वयात शिक्षण घेण्याचा नाद सोडला नाही. त्यांनी लग्नानंतर अर्थशास्त्रात एम. ए. केले. शिक्षिका होण्याचे शिक्षण घे, असे नेहमी सांगणे होते. मात्र, त्यांना वेगळ्याच विषयात करिअर करायचे होते. सासरी असताना ताईंनी बी.एड. प्रवेशासाठी प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. केले. आज त्या शेतीचे अर्थशास्त्र व्यवस्थितपणे हाताळतात.

शेतीशाळेमुळे आयुष्याला कलाटणी
२००२ मध्ये कृषी विभागाच्या शेतीशाळेने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या शेतीशाळेत रेशीम शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात येत होते. शेतीशाळेच्या मार्गदर्शक सीमा देशमुख यांनी पौर्णिमाताईंची झोकून देण्याची तयारी पाहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. कृषी विभागाने रेशीम शेतीसाठी त्यांच्या गावातील दहा शेतकरी निवडले. मात्र, त्यापैकी तीनच शेतकरी तयार झाले. या तीनपैकी केवळ पौर्णिमाताईंनी रेशीम शेतीत रस दाखविला. २००६ मध्ये कृषी विभागाने दिलेल्या तुती रोपांची दोन एकर शेतात लागवड केली. अंडीपुंज मिळाल्यानंतर त्याच्या संगोपनाकडे व्यवस्थित लक्ष दिले. चार वर्षांपासून त्या रेशीम शेती करीत असून, गतवर्षी त्यांना १ लाख ८६ हजारांचे उत्पन्न झाले. खर्च वगळता त्यांना १ लाख ४८ हजार रुपये निव्वळ नफा झाला. यावर्षी आतापर्यंत चार पिके त्यांनी घेतली असून, त्यांना ८४ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांना मजुरीपोटी १० हजार रुपये खर्च आला. पाला गोळा करणे, अंडीपुंज सोडणे, रेशीम निघाल्यानंतर ते स्वच्छ करणे, पॅकिंग करणे आदी कामे त्या केवळ दोन ते तीन मजुरांच्या भरवशावर करतात.

गांडूळ खताचा प्रकल्प
पौर्णिमाताईंनी केवळ पीकपद्धतीत बदल करून आधुनिक शेती केली नाही, तर २००५ मध्ये गांडूळ खतप्रकल्प सुरू करून शेतीला जोडधंद्याची ‘जोड’ दिली. उच्चप्रतीचे गांडूळ आणून ताईंनी केवळ त्यांच्या शेतापुरता प्रकल्प राबविला. मात्र, उत्कृष्ट व्यवस्थापनातून त्या गांडूळ खतही विकतात. यावर्षी त्यांनी चार बाय अडीच आकाराचे १२ बेड तयार केले असून, एका बेडमध्ये १० किलो गांडूळ टाकून उत्कृष्ट खत त्या तयार करत आहेत. यंदा त्यांना एक हजार प्रतिक्विंटलप्रमाणे ऑर्डरही मिळाल्या आहेत. गतवर्षी त्यांनी ३०० क्विंटल खताची व ८०० रुपये किलो दराने गांडूळाची विक्री केली.

सेंद्रिय शेतीवर भर
शेतीशाळेतील मार्गदर्शन ऐकल्यानंतर पौर्णिमाताईंनी संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करायचे ठरविले. आज त्या शेतात गांडूळ खत, शेण खत, हिरवळीचे खत टाकतात. गेल्या कैक वर्षांपासून त्यांनी शेतात रासायनिक खतांचा एक दाणाही टाकला नाही. सोयाबीन, हरभरा, तीळ किंवा कापूस असो, सर्व पिकेत्या सेंद्रिय पद्धतीने घेतात. तसेच सेंद्रिय शेतीचा प्रसारही करतात. वेगवेगळ्या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांतून त्या सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देतात. रेशीम किड्यांची विष्टाही खत म्हणून वापरतात. ही १० किलो विष्टा ४० किलो युरियाचे काम करते, असेही त्या अनुभवातून ठासून सांगतात.

टाकाऊपासून टिकाऊ
रेशीमचे उत्पादन घेतल्यानंतर शिल्लक राहिलेले रेशीम कोष फेकून दिले जातात. त्यामध्ये अळी असल्यास ती मारून त्याचा कचरा केला जातो. मात्र, पौर्णिमाताईंनी या कोषापासून आकर्षक हार तयार केले असून, अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. केवळ रेशीम कोषच नाही, तर कापूस काढल्यानंतर सुकलेली बोंडे, गवत यांचा उपयोग करून त्यांनी सुंदर कुरडी बनविली आहे. तसेच रेशीम कोषांपासून हुबेहूब गुलाबाची वाटणारी रंगीबेरंगी फुलेही बनविली आहेत. केवळ रेशीम घेऊन भागणार नाही, तर आकर्षक हार व फुले बनवून रेशीम कोषांपासून उत्पन्न मिळविता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

बचतगटाचा फुलविला संसार
त्यांनी टाकरखेडा येथे महिला बचतगट स्थापन केला असून, या बचतगटाच्या माध्यमातून २००५ ते २००९ पर्यंत माय मंजुळा माता दूध उत्पादक संघही चालविला. गावातील दूध गोळा करून ते सहकारी दूध डेअरीला विकायचे, असे काम हा बचतगट करायचा. पौर्णिमाताईंनी गावात कृषी विज्ञान मंडळ, महिला शेतकरी मंडळही स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध शेती मार्गदर्शन व धार्मिक कार्यक्रम घेतले. दर एकादशीला गावात महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून त्या चालू सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात.

राजकारणातही ठसा
पौर्णिमाताईंनी केवळ शेतीतच नाही, तर राजकारणातही ठसा उमटविला आहे. १९९५ ते २००० या कालावधीत त्या टाकरखेडा (संभू) गावाच्या ग्रामपंचायत सदस्या, तर २००२ मध्ये भातकुली पंचायत समितीच्या सदस्या होत्या. त्यांच्या प्रचाराचा नारळ त्या स्वत:च फोडत व सर्व भाषणे त्याच देत, मात्र, आता त्यांनी राजकारण सोडले आहे.

घरीच थाटले कृषी ग्रंथालय
ताईंना वाचनाची प्रचंड आवड. त्यातही कृषिविषयक साहित्याची जास्तच. त्यामुळे त्यांनी घरीच कृषी ग्रंथालय साकारले आहे. त्यांच्या ग्रंथालयात ७०० पुस्तके आहेत. दररोज एक ते दीड तास त्या ग्रंथालयात असतात. शेती विषयावरील कुठलेही पुस्तक असो ते ताईंच्या ग्रंथालयात असतेच.

पौर्णिमाताईंचा गौरव
पौर्णिमाताईंना २००६ साली राज्य शासनाचा राष्ट्रमाता जिजाऊ कृषिभूषण पुरस्कार, २००६ चा वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा शेतीनिष्ठ पुरस्कार, २००८ मध्ये शेतकरी एकता मंच (वर्धा) चा कृषिभूषण पुरस्कार, २००९ चा लक्षाधीश रेशीम शेतकरी पुरस्कार, २००८ मध्ये राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझरचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.*

– नीलेश तायडे/अमरावती

आदर्श गावांची ‘यशोगाथा’ तयार होणार!

अहमदनगर : राज्यातील १९ जिल्ह्यांतील ५० आदर्श गावांची निवड केल्यानंतर त्या गावांत जलसंधारणाची मोठी कामे करण्यात आली आहेत. या गावांत १० कोटी १० लाखांचा निधी वितरित करण्यात आला असून, ६ कोटी ३८ लाख रुपये खर्च झाला आहे.

Read More